(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उफाळलेल्या बॅनर वादाने आता गंभीर राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणावरून तालुक्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे शिवसेनेने संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास संगमेश्वर तालुक्यात ‘सर्वपक्षीय बंद’ पुकारण्याचा आणि पोलीस प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर व रोहित तांबे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या वेळी माजी पालकमंत्री रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. साडवलीतील विजयी उमेदवार शमा संतोष जाधव यांच्या अभिनंदनपर बॅनरची तोडफोड झाल्याच्या घटनेतून हा वाद उफाळला आहे. विजय धने, शुभम धने व दीपक डोंगरे यांनी बॅनर फाडून जाधव यांच्या वडिलांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. ठाकरे गटाच्या मते, घटनास्थळी उपस्थित नसलेल्या काही निरपराध तरुणांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रत्यक्ष दोषींना मात्र पाठीशी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस निरीक्षक झावरे यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील तरतुदींचे पालन न करता तपास प्रक्रियेत निष्पक्षता राखली नाही, असा आरोपही करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज वा प्रत्यक्ष साक्षीदारांची शहानिशा न करता केवळ अधिकाराचा वापर करून कारवाई केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी स्वतंत्र तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरुकर, माजी सभापती छोट्या गवाणकर, रोहित तांबे, राष्ट्रवादीचे निलेश भुवड, बाबा बोथले आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
झावरे यांची कारकीर्द यापूर्वीही ठरलीय वादग्रस्त
साडवली बॅनर वादानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने केवळ स्थानिक राजकारण तापवले नाही, तर संपूर्ण पोलिस प्रशासनालाच प्रश्नांच्या कटघऱ्यात उभे केले आहे. आता सर्वांच्या नजरा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेने या प्रकरणात ठाम आणि पारदर्शक निर्णय घेणे अपरिहार्य ठरते. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची कारकीर्द यापूर्वीही संगमेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांची पुनर्नियुक्ती संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलिस ठाण्यात करण्यात आली आणि तेव्हाच ‘इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना?’ हा प्रश्न उपस्थित झाला होता. आज तोच प्रश्न अधिक ठळकपणे समोर आला आहे. एका बॅनर वादातून तालुक्यात ‘सर्वपक्षीय बंद’ची वेळ येणे ही केवळ राजकीय प्रतिक्रिया नाही; तर ती पोलिस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर उमटलेली काळी रेघ आहे. निष्पक्षतेवर संशय निर्माण झाला की कायद्याची काठी कितीही मजबूत असली तरी तिची नैतिक ताकद क्षीण होते. प्रशासनाचा गाभा हा विश्वासावर उभा असतो. तोच विश्वास डळमळीत झाला तर कायद्याचे राज्य कागदावरच उरते. एका अधिकाऱ्याच्या कथित वादग्रस्त कारभारामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलिन होणे ही चिंतेची बाब आहे.
पोलिस अधीक्षक कोणती भूमिका घेणार?
या वादाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि नियमपालनासाठी ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जिल्ह्यात दृढ आहे. त्यामुळे या प्रकरणात ते कोणती भूमिका घेतात, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना, प्रशासनाची विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी अधीक्षकांवर येऊन ठेपली आहे. पोलिस प्रशासनाची प्रतिमा जपण्यासाठी कठोर पाऊल उचलले जाईल की परिस्थिती निवळेपर्यंत संयमाची भूमिका घेतली जाईल? येणारे दिवसच या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत.

