(फुणगूस / एजाज पटेल)
पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेचा ग्रामीण भागात किती प्रभावीपणे अंमल होतो, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती सध्या फुणगूस आणि डिंगणी परिसरात पाहायला मिळत आहे. भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने फुणगूस येथे मोबाईल टॉवर उभारला असला, तरी त्यातून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बीएसएनएलच्या नव्या टॉवरमुळे परिसरात दर्जेदार नेटवर्क सेवा मिळेल, या अपेक्षेने अनेक नागरिकांनी खासगी कंपन्यांची सिमकार्डे बंद करून बीएसएनएलची सिमकार्डे घेतली. सुरुवातीच्या काही दिवसांत सेवा समाधानकारक होती. मात्र त्यानंतर नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होऊ लागले. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, पूर्वीची सेवा तुलनेने अधिक चांगली होती, अशी भावना व्यक्त होत आहे.
परिसरात नेटवर्क कधी उपलब्ध राहील आणि कधी खंडित होईल याचा कोणताही नेम नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकवेळा नेटवर्क पूर्णपणे गायब होऊन काही दिवस सेवा बंद राहते. त्यामुळे मोबाईलद्वारे संपर्क साधणेही कठीण बनते. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागरिक दरमहा मोबाईल रिचार्जसाठी खर्च करीत असले तरी त्यांना त्यानुसार सेवा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर, बँक व्यवहारांवर, शासकीय सेवांच्या वापरावर तसेच दैनंदिन संवाद व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल सुविधांपासून वंचित राहावे लागत असताना संबंधित प्रशासन मात्र उदासीन असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बीएसएनएलने तातडीने नेटवर्क सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रमोद शिंदे यांचा इशारा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खाडी विभाग प्रमुख प्रमोद मोहन शिंदे यांनी या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुणगूस, डिंगणी आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात नेटवर्कची अत्यंत खराब स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनतेची होत असलेली गैरसोय, नेटवर्कमधील सातत्याने येणारे अडथळे आणि प्रशासनाची उदासीनता याकडे बीएसएनएलने गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रमोद शिंदे यांनी दिला आहे. यामुळे आता बीएसएनएल प्रशासन या समस्येवर कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

