(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी येथे श्रीकृष्ण तेर्ये गोपाळवाडी या मंडळाने रविवार 20 एप्रिल रोजी येथील तेर्ये बुरंबी येथील भव्य अशा मैदानात गोपाळ समाज मर्यादित कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील अकरा संघांनी भाग घेतला होता. प्रथमच आयोजित कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम पाहण्यासाठी प्रचंड अशी प्रेक्षकांची गर्दी उसळली होती.
गोपाळ समाज मर्यादित कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा प्रथम विजेता मानकरी संघ ठरला पद्मावती मार्गताम्हाणे तर रायगड संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली. श्रीकृष्ण तेर्ये गोपाळवाडी मंडळाने प्रथमच आयोजन केलेल्या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील प्रतिष्ठित उद्योजक अण्णा सामंत, चिपळूण-संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, नावडी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, तंटामुक्त अध्यक्ष सुनिल दळवी, प्रतिष्ठित व्यापारी नरेश जागुष्टे, आनंद घवाळी, पोलीस पाटील मनोज शिंदे आदींची राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
अंतिम सामन्यात भरारी घेतलेल्या पद्मावती मार्गताम्हाणे तसेच रायगड संघाचा तेर्ये बुरंबी येथील लाल मातीच्या मैदानावर कबड्डीतील दम आणि थरार पाहायला मिळाला. बलाढ्य अशा दोन्ही संघांतील लढतीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या पद्मावती मार्गताम्हाणे संघाने 25 गुण स्वतःच्या पारड्यात मिळवण्याची किमया करून प्रतिस्पर्धी रायगड संघाला अवघ्या 5 गुणांवर समाधान माणण्यास भाग पाडून श्रीकृष्ण तेर्ये गोपाळवाडी आयोजित पहिल्या पर्वाच्या प्रथम पारितोषिकवर आपले नाव सुवर्णाक्षरात नाव कोरले. स्पर्धा म्हटले की एकाची जीत तर दुसऱ्याची हार हे असतेच पण मैदानात उतरल्यावर जिंकण्यासाठी दिलेली झुंज महत्वाची असते. दोन्ही संघतील प्रत्येक खेळाडू मैदानावर जान की बाजी लगावत झुंज देताना दिसत होता. मात्र रायगड संघच्या खेळाडूंना अंतिम सामन्यात सुरुवाती पासूनच यश न आल्याने उपविजेता पदावरच समाधान मानावे लागले.
प्रथम विजेता मानकरी संघ पद्मावती मार्गताम्हाणे संघाला तसेच उपविजेता रायगड संघाला वाडीतील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ठ पकड पद्मावती मार्गताम्हाणे संघाचा प्रदीप जाधव, उत्कृष्ठ चढाई रायगड संघाचा गौरव माने, उत्कृष्ठ खेळाडू पद्मावती मार्गताम्हाणे संघाचा मंदार साबळे यांनाही मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
निलेश खामकर, राजा गायकवाड, मकरंद नलावडे, योगेश घडशी, राहुल गिते यांनी अतिशय उत्तम अशी पंच म्हणुन कामगिरी पार पाडली तर रत्नागिरी येथील राजा देसाई यांनी संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अजय शंकर साबळे,विजय रघुनाथ साबळे,सूरज गजबार, तेजस गजबार,हर्षद साबळे,नक्षा चव्हाण, संजय गजबार, बबन गजबार,बबन साबळे, शांताराम गजबार, दत्ताराम गजबार,संजय साबळे, संजय गजबार, शशांक गजबार, चंद्रकांत गजबार, सचिन गजबार, नागेश चव्हाण, अंकुश गजबार, विलास गजबार आदी वाडीतील ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.