(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता अखेर संपली असून परचुरी येथील शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी निवड झाली आहे. सर्वसाधारण महिला आरक्षणातून ही निवड झाल्याने पंचायत समितीला पुन्हा महिला नेतृत्व मिळाले आहे. शर्वरी वेल्ये या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या असून त्या संगमेश्वर पंचायत समितीच्या इतिहासातील ३७ व्या सभापती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या स्थापनेपासून आतापर्यंत १० महिलांना सभापती होण्याचा मान मिळाला होता आणि शर्वरी वेल्ये या अकराव्या महिला सभापती म्हणून विराजमान झाल्या आहेत.
संगमेश्वर तालुका पंचायत समितीची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. त्यावेळी म. वि. पवार यांना पहिला सभापती होण्याचा मान मिळाला. त्यानंतर मु. अ. मोडक, सि. धो. सावंत आणि ना. का. शेट्ये यांनी ३० एप्रिल १९८१ पर्यंत पंचायत समितीचा कारभार सांभाळला. पुढे १ मे १९८१ ते १३ मार्च १९९२ या कालावधीत पंचायत समितीवर प्रशासकीय कारभार होता. त्यानंतर १४ मार्च १९९२ रोजी सुभाष शांताराम बने यांनी सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांनी १९९७ पर्यंत सलग पाच वर्षे ही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नंतर जयराम गो. रामाणे यांनी एक वर्ष सभापतीपद भूषवले.
यानंतर झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती म्हणून शालिनी बा. गोवळकर यांना संधी मिळाली. त्यानंतर विजय गो. कदम, संतोष मारुती लाड आणि स्मिता संतोष लाड या पती-पत्नीला सलग दोन वेळा सभापतीपदाची संधी मिळाली. पुढील काळात कृष्णा गु. हरेकर, दिगंबर स. देसाई, सुभाष बा. नलावडे, नारायण रावजी भुरवणे, मधुकर सोमा गुरव, दिलीप कृष्णा पेंढारी, राजेश रमाकांत मुकादम, नंदादीप नंदकुमार बोरुकर, नम्रता नितीन कवळकर, सुजित विष्णू महाडिक, दीप्ती दीपक सावंत, मनीषा मुकुंद गुरव आणि संतोष रामचंद्र डावल यांनी १८ जानेवारी २०१६ पर्यंत सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.
यानंतर डॉ. हर्षदा हेमंत डिंगणकर, सारिका किरण जाधव, दिलीप श्रीराम सावंत, सोनाली रामचंद्र निकम, सुजित विष्णू महाडिक आणि प्रेरणा प्रदीप कानाल यांनी १५ मार्च २०२१ पर्यंत पंचायत समितीचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर जयसिंग लक्ष्मण माने यांनी २०२३ पर्यंत सभापतीपद भूषवले. विशेष म्हणजे १९९२ पासून ते २०२३ पर्यंत पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिला असून या पदावर प्रामुख्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच संधी मिळाली आहे.
सध्या झालेल्या निवडणुकीत सभापतीपद सर्वसाधारण महिला असे आरक्षित झाले होते. त्यामुळे निवडून आलेल्या महिला सदस्यांमधून कोणाला ही संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर या प्रतिष्ठेच्या पदासाठी परचुरी येथील शर्वरी वेल्ये यांची निवड होत संगमेश्वर तालुक्याला ३७ वा सभापती मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे त्या पंचायत समितीच्या इतिहासातील अकराव्या महिला सभापती ठरल्या असून तालुक्यातील विकासकामांना नव्या गतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

