(तुषार पाचलकर / राजापूर)
जुवाटी हायस्कूलमधील ज्येष्ठ व आदर्श शिक्षक श्री. बी. के. गोंडाळ सर यांचे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास जुवाटी येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांना काही दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. रात्री अचानक श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरल्यासारखी अवस्था निर्माण झाली आणि त्याच वेळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बी. के. गोंडाळ सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात दिशा देणारे मार्गदर्शक होते. शिकवलेले विद्यार्थ्यांना नीट समजले आहे का, याची खात्री करून घेणारे, गरज भासल्यास विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधणारे आणि नातेसंबंध जपणारे ते आदर्श शिक्षक होते.
‘वाचाल तर वाचाल’ ही संस्कृती समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरी जिल्ह्यात स्वतःच्या पुढाकाराने वाचनालये सुरू करून त्यांनी वाचन चळवळीला चालना दिली. तसेच सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना असून तो प्रत्येकाने जपावा, या भूमिकेतून त्यांनी स्वतःच्या खर्चाने वह्या वाटप करून हस्ताक्षर सुधार उपक्रम राबवले.
कोणताही सामाजिक उपक्रम असो, ते आवर्जून उपस्थित राहत आणि शक्य तेवढे सहकार्य करत. राष्ट्र सेवा दल, विविध शिबिरे, सुट्ट्यांमध्ये सामाजिक संस्था व उपक्रमांना भेटी देत त्यांनी वेळेचा समाजासाठी उपयोग केला. समाजहितासाठी झटणारा एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.
सामाजिक रूढी व परंपरांना छेद देत, आपल्या निधनानंतर पत्नीने मंगळसूत्र व इतर दागिने काढू नयेत, यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देणारे त्यांचे आगळेवेगळे विचार आजही समाजाला अंतर्मुख करणारे आहेत.
आज त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘आपण आपल्यात नाहीत’ हे मान्य करणे कठीण वाटत आहे. त्यांनी जपलेली मूल्ये, विचार आणि कार्य पुढे नेणे, हीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

