(पुणे)
पोटचा बापच जेव्हा मुलांचा काळ बनतो, तेव्हा माणुसकीही थरारते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशीच मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी घर सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचवेळी पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो सुदैवाने बचावला. ही हृदयद्रावक घटना आळेफाटा परिसरात घडली असून पोलिसांनी आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय 29, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) याला अटक केली आहे.
पत्नी घर सोडून गेल्यानंतर तणाव
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. त्यानंतर तो आपल्या दोन लहान मुलांसह राहत होता. दोन लहान मुलांचा सांभाळ करताना तो मानसिक तणावाखाली होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थिरतेतून आरोपी सतत चिडचिड करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आरोपीने दोन्ही मुलांना फिरायला जाण्याचे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन त्याने प्रथम पाच वर्षीय मुलगा आर्यनचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मुलगा बेशुद्ध पडल्यावर तो मृत झाल्याचा समज करून आरोपीने त्याला जंगलात टाकून दिले. मात्र काही वेळाने आर्यन शुद्धीवर आला आणि त्याचा जीव वाचला.
निष्पाप मुलीची निर्घृण हत्या
यानंतर आरोपीने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलगी हर्षदाचा गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. बुधवारी सकाळी आर्यन शुद्धीवर आला आणि रडत पुणे-नाशिक महामार्गावर पोहोचला. दरम्यान, जंगल परिसरात एक लहान मुलगा घाबरलेल्या अवस्थेत आढळल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला.
पोलिस तपासात आरोपीची कबुली
तपासादरम्यान मुलाच्या सांगण्यावरून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आणि पोलिसांची दिशाभूल करणार्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी चिमुरडी हर्षदाचा मृतदेह जंगलातून ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

बापाने रडत रडत जोडले हात
स्वतःच्या दोन लहान मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागर शिंदे या आरोपीविरोधात आता त्याच्या वडिलांनीही कठोर शिक्षेची मागणी केली आहे. “माझ्या मुलाला फाशी द्या,” अशी हात जोडून विनंती केली. आरोपीचे वडील सदाशिव शिंदे यांनी व्यक्त केलेला आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही हळहळले.
“कचऱ्यासारखी पोर फेकून दिली”
माध्यमांशी बोलताना सदाशिव शिंदे यांनी रडत रडत हात जोडले. “एवढ्या लहान लेकराची हत्या केली. साडेतीन वर्षांचं लेकरू मारून टाकलं. कचऱ्यासारखी पोर फेकून दिली. तो सुटला तर आम्हालाही मारेल. त्याला फाशी द्या,” अशी आर्त मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. “पोरीची हत्या करून तो घरी परत आला. दाढी-कटिंग करून येऊनपुन्हा फिरत होता. त्याला मुलं नको होती, असंही तो म्हणायचा,” असा दावा त्यांनी केला.
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
या अमानुष घटनेमुळे जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न यांसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

