( रत्नागिरी / वार्ताहर )
शहरातील सुवर्णकार आणि विविध नामांकित बँकांचे अधिकृत सोने मूल्यनिर्धारक म्हणून परिचित असलेले सागर नार्वेकर (वय ५०) यांचे रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने रत्नागिरीतील सराफ व्यावसायिक, बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुवर्णकार म्हणून त्यांनी रत्नागिरी शहरात विश्वासार्हता आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. शहरातील विविध नामांकित बँकांमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृत सोने मूल्यनिर्धारक (व्हॅल्युएटर) म्हणून कार्यरत होते. प्रामाणिकपणा आणि कामातील अचूकतेमुळे बँकिंग क्षेत्रासह ग्राहकांमध्येही त्यांना मानाचे स्थान होते. शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा शहरात मोठा मित्रपरिवार होता.
तरुण वयात सागर नार्वेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) सक्रियपणे काम केले होते. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात रत्नागिरी शहरात झालेल्या विविध सामाजिक आंदोलनांमध्ये आणि जनहिताच्या लढ्यांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी पहाटे सुमारे २.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज रत्नागिरीत आणण्यात येणार असून, दुपारी १.३० वाजता शिवाजीनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी शहरावर शोककळा पसरली आहे.


