(देवरुख)
देवरुख येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या अत्यंत महत्त्वाच्या मागणीचा विषय पुन्हा एकदा अग्रक्रमाने मांडण्यात आला. निसर्गरम्य चिपळूण–संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर आणि समन्वयक रुपेश मनोहर कदम यांनी लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात खासदारांना भेटून हा विषय मांडला.
संगमेश्वर रोड स्थानकावर दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या स्थानकावर ९ अतिरिक्त एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी संबंधित ग्रुपने पूर्वीच कोंकण रेल्वे प्रशासनाकडे केली होती. या मागणीवर झालेल्या बैठकीत जामनगर, पोरबंदर आणि मडगाव एक्सप्रेस या तीन गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यासाठी सर्व बाबी अनुकूल असल्याचे कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले होते. त्यानुसार प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या बैठकीला स्थानिक आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते. त्यांनीही आपल्या पत्राद्वारे या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. रेल्वे बोर्डाकडून थांबा मंजुरीसाठी स्थानिक खासदारांची शिफारस आवश्यक असल्याने, मे २०२५ मध्ये खासदार नारायण राणे यांना भेटून ग्रुपने ही मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी तत्काळ रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र दिले आणि “दोन दिवसांतच रेल्वे मंत्र्यांना भेटून मंजुरी घेतो” असे आश्वासन दिले होते.
तथापि, सहा महिने उलटूनही या थांब्यांना मंजुरी मिळालेली नसल्याने या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात आली. दरबारात उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी थेट बोलून संगमेश्वर रोड स्थानकावरील थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न मी करीन.”
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत कोकणातील शेजारील जिल्ह्यांतील काही स्थानकांना रेल्वे मंत्र्यांनी मंजूर केलेले थांबे पाहता, “आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड दुर्लक्ष का करतो?” असा प्रश्न स्थानिक प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

