(शाहूवाडी/ रत्नागिरी प्रतिनिधी)
रत्नागिरी–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान करण्यात आलेल्या खोदकामामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील निळे गावाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी एका गवा रेड्याचा तब्बल ३० फूट खोल दरडीत पडून गंभीर अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जंगलातून रस्ता ओलांडताना गवा रेड्याला खोदकामाची खोली लक्षात आली नाही. परिणामी तो थेट रस्त्यालगत तयार झालेल्या खोल दरडीत कोसळला. या अपघातात गव्याच्या मणक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली असून, पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती वनविभागाने दिली. अपघातानंतर गवा हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी गव्याला बाहेर काढून उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याचे समजते.
रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम आणि दरडी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या कामांमुळे वनक्षेत्रातील प्राण्यांसाठी गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अरुंद रस्ते वन्यप्राणी सहजपणे पार करत असत. मात्र आता महामार्गाची रुंदी वाढल्याने आणि रस्त्यालगत खोल दऱ्या निर्माण झाल्याने वन्यजीवांच्या अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशअभावी वन्यप्राण्यांना खोदकामाचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

