(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावची सुकन्या कस्तुरी प्रशांत लोगडे हिने कल्याण येथील ‘शैशव प्री-स्कूल’मध्ये सीनियर केजी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे फुणगूस पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कस्तुरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कस्तुरीचे वडील प्रशांत लोगडे आणि माता सौ. स्नेहा लोगडे हे दोघेही उच्चशिक्षित असून, त्यांच्या शैक्षणिक वारशासोबतच मिळालेल्या सुसंस्कारांचा प्रभाव कस्तुरीच्या यशातून स्पष्टपणे दिसून येत आहे. आपल्या लेकीने शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, ही पालकांची इच्छा आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
‘मला डॉक्टर व्हायचंय आणि सर्वांची सेवा करायचीय’
कस्तुरीच्या यशाइतकीच तिच्या निरागस पण प्रेरणादायी स्वप्नाचीही चर्चा होत आहे. भविष्याबद्दल विचारले असता, “मला डॉक्टर बनायचे आहे आणि सर्वांची सेवा करायची आहे,” असे तिने आत्मविश्वासाने सांगितले. एवढ्या लहान वयात जनसेवेची भावना तिच्या मनात रुजली असल्याने उपस्थितांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. खेळण्यांच्या दुनियेत रमण्याच्या वयात कस्तुरीने पाहिलेले हे स्वप्न तिच्या संवेदनशील आणि प्रगल्भ विचारांची जणू नांदीच ठरत आहे. तिच्या तोंडून उमटलेले हे बोबडे बोल अनेकांच्या मनाला स्पर्शून गेले.
डॉक्टर होऊन गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न
कस्तुरीच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि जनसेवेची ओढ तिच्या भविष्यातील मोठ्या यशाची चाहूल देणारी ठरत आहे. केवळ डॉक्टर होण्याचे आकर्षण नव्हे, तर आजारी आणि गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची तिची भावना सर्वांनाच भावत आहे.
फुणगूसच्या मातीतली माणुसकी, आई-वडिलांकडून मिळालेली संवेदनशीलता आणि शिक्षणाचे संस्कार यामुळेच कस्तुरीच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे, असे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
अवघ्या चिमुकल्या वयात मिळवलेले हे यश आणि समाजसेवेचे तिचे ध्येय फुणगूस ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. भविष्यात कस्तुरीने डॉक्टर होऊन आपल्या गावाचे, पालकांचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

