(चिपळूण)
मांडकी पालवण, ता. चिपळूण येथे दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजयजी भावे यांनी राज्यातील सर्व साहित्यप्रेमी, शेतकरी, युवक आणि अभ्यासकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार या महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महत्त्वाच्या विषयांवर सखोल चिंतन होणार असून नामवंत साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासक आपल्या अनुभवातून मोलाचे विचार मांडणार आहेत. मराठी साहित्याची परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यांचा सुंदर संगम या संमेलनातून अनुभवायला मिळणार असल्याचे श्री. भावे यांनी सांगितले.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून या ग्रंथदिंडीतून ज्ञान, संस्कृती आणि साहित्याचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर तिन्ही दिवस विविध सत्रांतून शेती, सहकार, ग्रामीण विकास, सामाजिक परिवर्तन आणि समकालीन साहित्य या विषयांवर चर्चा, परिसंवाद आणि संवादात्मक कार्यक्रम होणार आहेत. या माध्यमातून शेतकरी आणि साहित्यिक यांच्यात थेट संवाद घडवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.
ग्रामीण भागातील प्रश्न, शेतीसमोरील आव्हाने आणि सहकार चळवळीचे बदलते स्वरूप यावर साहित्यिक दृष्टीकोनातून विचारमंथन होणे ही काळाची गरज आहे. हे संमेलन केवळ साहित्यिकांसाठी मर्यादित नसून शेतकरी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास श्री. संजयजी भावे यांनी व्यक्त केला.
मांडकी पालवण येथे आयोजित हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन मराठी साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यामुळे या तीनही दिवसांत मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्य, शेती आणि सहकार या विषयांवरील विचारांची देवाणघेवाण अनुभवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामीण जीवन व कृषी संस्कृतीतून महाराष्ट्राची ओळख
“ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृती हाच महाराष्ट्राचा खरा आत्मा आहे. या समृद्ध परंपरेचा अनुभव घेण्यासाठी, तसेच नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनी या तीन दिवसीय ज्ञानयज्ञात आवर्जून सहभागी व्हावे,” असे आवाहन स्वागताध्यक्ष व दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले आहे.

