(चिपळूण / वार्ताहर)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सह्याद्री जिम्नॅशियम आणि गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथील अत्याधुनिक रिसर्च लॅबचे उद्घाटन सुप्रिया लाइफ सायन्सेसचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या दुहेरी उपक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात नवे दालन खुले झाले आहे.
उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार श्री शेखरजी निकम, उपाध्यक्ष श्री प्रशांत शेठ निकम, उपाध्यक्षा युगंधरा ताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष श्री अनिरुद्ध निकम, संचालक श्री गुलाब सुर्वे व श्री हरिश्चंद्र सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे, तर शारीरिक व मानसिक सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने संस्थेने आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे जिम्नॅशियम उभारले आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांसह अत्याधुनिक व्यायामशाळेची सोय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून सहयाद्री शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करण्यासाठी आवश्यक वातावरण मिळणार आहे.
याचबरोबर गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे उभारण्यात आलेली अत्याधुनिक रिसर्च लॅब विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात नवी दिशा देणारी ठरणार आहे. आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही लॅब विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देऊन औषधनिर्मिती आणि विज्ञान क्षेत्रात नवे संधीसाधन निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सतीश वाघ यांनी कोकणात अशा दर्जेदार रिसर्च लॅबची गरज अधोरेखित करत सुप्रिया लाइफ सायन्सेसचा सह्याद्री शिक्षण संस्थेला संशोधन क्षेत्रात कायम पाठिंबा राहील, असे सांगितले. तर संस्थेचे अध्यक्ष व आमदार श्री शेखरजी निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्था कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असून जिम्नॅशियम व रिसर्च लॅब हा त्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे नमूद केले.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी जिम्नॅशियम व रिसर्च लॅबची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या प्रतिनिधींनी केले. एकूणच, सह्याद्री शिक्षण संस्थेचा हा उपक्रम कोकणातील शैक्षणिक व क्रीडा विकासाला नवी चालना देणारा ठरणार असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

