(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि सामूहिक सहभागातून साजरा करण्यात आला. या निमित्ताने रिक्षा मालक–चालक संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी कडवई–तुरळ–चिखली या मार्गावर प्रभातफेरी आणि रिक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे ८५ रिक्षा सहभागी झाल्या होत्या. रिक्षांवरील ध्वनिक्षेपकांवर देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रिक्षा संघटनेच्या वतीने कडवई, तुरळ आणि चिखली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटपही करण्यात आले.
यानंतर कडवई बाजारपेठेत सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. या वेळी भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल आणि द इंग्लिश स्कूल, कडवई येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
या प्रसंगी रिक्षा संघटनेच्या वतीने माजीसैनिक अंकुश साळुंके आणि परशुराम कदम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सेवेबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कडवई पंचक्रोशीतील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागाने प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि एकात्मतेच्या भावनेत साजरा करण्यात आला.

