(चिपळूण)
‘मृत्यूही सोबतच यावा’ अशी अनोखी प्रेमगाथा साकार करत निवळी येथील वयोवृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. पती मनोहर श्रीपतराव सुर्वे (वय ९१) आणि पत्नी संगीता मनोहर सुर्वे (वय ८१, रा. निवळी) या दोघांचे रविवारी काही तासांच्या अंतराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार सोमवारी चिपळूणमधील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर सुर्वे हे रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी होते. तर त्यांची पत्नी संगीता या गृहिणी म्हणून संसार सावरत होत्या. वयोमानपरत्वे मनोहर सुर्वे काही काळ आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे निधन होताच, काही मिनिटांतच संगीता सुर्वे यांचीही प्रकृती खालावली आणि त्यांनीही शांतपणे या जगाचा निरोप घेतला.
दाम्पत्याने त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार चिपळूणमधील रामतीर्थ स्मशानभूमीत व्हावेत, अशी स्पष्ट इच्छा पूर्वीच कागदावर लिहून ठेवली होती. त्यांच्या निधनानंतर मुलींनी व नातेवाइकांनी ही अंतिम इच्छा जपली आणि दोघांवरही एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दाम्पत्यामागे दोन मुली, एक मुलगा व आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या जीवनातील अखेरचा निर्णयही एकत्र होता, ही बाब उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ रथातून सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.