(देवरुख)
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ऑटो एक्स्पो २०२६ चे भव्य आयोजन पार पडले.
महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा पटांगणामध्ये तंत्रज्ञानाधारित मॉडेल्स, विंटेज क्लासिक्स तसेच पॉवर-ट्यून केलेली परफॉर्मन्स वाहनांचे नेत्रदीपक प्रदर्शन आणि चित्तथरारक शो सारखे कार्यक्रम पार पडले. ऑटोमोबाईल अभियांत्रिकी क्षेत्रातील नावीन्य, तांत्रिक कौशल्य आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यांचे उत्कृष्ट दर्शन या प्रदर्शनातून घडले. प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मॉडिफाइड कार्स व एअर सस्पेन्शन तंत्रज्ञान असलेल्या कार्स व बाइक्स विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सीइओ प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. अनिरुध्द जोशी इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. महेश भगवत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
या प्रदर्शनात गोवा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग अशा विविध भागातून तब्बल ५० पेक्षा अधिक कार व बाईक्स आल्या होत्या. यातील महिंद्रा थार, टोयोटा हायलक्स, मर्सिडीझ, एम जी कॉमेट आणि रॉयल एन्फिल्ड कॉंटिनेंटल जीटी ६५०, बेनेली ६०० आय, के टी एम ड्यूक ३९० यासारख्या ३० विशेष मॉडीफाइड कार्स व बाईक्स धारकांनी चित्तथरारक ड्रिफ्ट शो सादर केला. यावेळी मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन ड्रीफ्ट करण्याचे वाहन चालकांचे कौशल्य प्रत्यक्षात पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन तसेच उत्पादित केलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त गो कार्ट व फॉर्म्युला कार देखील प्रेक्षकांना यानिनित्ताने पाहता आल्या. या संघांनीहि आपले तांत्रिक कौशल्य प्रभावीपणे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. वाहन प्रेमींसाठी हे प्रदर्शन एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळा ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सहभागींना गौरविण्यात आले याशिवाय सर्व सहभागींस प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. दुर्गेश शेटये यांच्या बाईकला सर्वोत्तम मॉडिफाईड बाइक तर श्री. सूरज मटकऱ यांच्या कारला सर्वोत्तम मॉडिफाईड कार पुरस्कार पटकाविला.
समारोप प्रसंगी अध्यक्षांनी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर उपप्राचार्य डॉ. अनिरुध्द जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून श्रवण करकरे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. भालचंद्र चव्हाण व श्रेयस बाणे यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिज्ञासा गोळे, अपेक्षा हेलोदे व समीक्षा पाटील यांनी केले. निखील विचारे, प्रेम धनावडे, अश्वजीत कांबळे, साईप्रसाद वरक, सानिका सापटे, सृजन शिरकर, जान्हवी मोरे, बिस्मा सोलकर, तन्वी पात्ये, ऋषिकेश बापट, सिद्धेश पाटील व इतर विद्यार्थी स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक यशस्वी झाला.

