( पुणे )
पुण्यातील पर्वती परिसरात नातेसंबंधाला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय आजोबाने आपल्या 9 वर्षांच्या सख्या नातीवर (स्वतःच्या मुलीच्या मुलीवर) अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिमुरडीने आईसमोर सांगितला धक्कादायक प्रकार
पीडित मुलीची आई कपड्याच्या दुकानात काम करते. रात्री कामावरून घरी परतल्यानंतर तिने मुलीच्या अंगावर जखमांचे व्रण आणि ओरखडे पाहिले. याबाबत विचारणा केली असता, चिमुरडीने रडत संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नव्हता. आई-वडील कामावर गेल्यानंतर आरोपी आजोबा तिला जबरदस्ती जवळ खेचत असल्याचे तिने सांगितले. खाऊचे आमिष दाखवून आणि भीती दाखवत आरोपी संधी साधत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आईचा आक्रोश; ‘अशा नराधमाला फाशी द्या’
या घटनेनंतर पीडित मुलीची आई पूर्णपणे हादरली असून तिने संताप व्यक्त करत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाने माझ्या काळजाच्या तुकड्यावर नजर टाकली, माझ्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
न्यायालयात आरोपीचे धक्कादायक उत्तर
पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याला तातडीने अटक करून पुणे सत्र न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अटक का झाली, असा प्रश्न विचारला असता आरोपीने “एका बाईने अफवा पसरवली म्हणून मला अटक झाली,” असे उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.
मोबाईल जप्त; पूर्वीच्या गुन्ह्यांचाही तपास
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातून आणखी काही धागेदोरे मिळतात का, याचा तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी मोबाईल चोरीच्या संशयावरून आरोपीला घराबाहेर काढण्यात आले होते. सुरुवातीपासूनच सासऱ्याचे वर्तन संशयास्पद होते. मी पत्नीला स्पष्ट सांगितले होते की, तुला बाप हवा की संसार? तेव्हा तिने मुलांचा आणि संसाराचा विचार केला होता, असे वडिलांनी सांगितले. आरोपी त्याच परिसरात चोरून राहत होता आणि योग्य संधीची वाट पाहत होता, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा आरोपही मुलीच्या वडिलांनी केला.
परिसरात तणावाचे वातावरण
या घटनेनंतर पर्वती परिसरात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही अफवा किंवा हिंसक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

