( कोलकाता )
पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्या खासगी सहाय्यकाची (PA) भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे ही धक्कादायक घटना घडली. चंद्रनाथ रथ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ आपल्या कारमधून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यात कार चालवत असलेल्या चालकाला देखील गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
बाईकवरून आले हल्लेखोर
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर दोन जण होते आणि ते दुचाकीवरून आले होते. विशेष म्हणजे, त्यांनी वापरलेल्या बाईकवर नंबर प्लेट नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शी सुकुमार दास यांनी सांगितले की, “अचानक गोळीबाराचा आवाज आला. आम्ही धावत गेलो तेव्हा दोन जण बाईकवरून पळून जाताना दिसले.” दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या कारचे छायाचित्रही समोर आले असून गोळ्यांमुळे कारची काच फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय
चंद्रनाथ रथ हे गेल्या पाच वर्षांपासून सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत काम करत होते. ते मुळचे चंदितालाचे रहिवासी असून सध्या मध्यमग्राम येथे राहत होते. घटनेची माहिती मिळताच सुवेंदु अधिकारी यांनी आपला दौरा अर्धवट सोडून मध्यमग्रामकडे रवाना झाले आहेत.
भाजपचा तृणमूल काँग्रेसवर आरोप
या हल्ल्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणत्याही आरोपीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या विविध हिंसक घटनांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील किमान आठ शहरांमध्ये तणाव असल्याची माहिती समोर आली असून जवळपास 500 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना वाढल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अशातच सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

