(मुंबई)
केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कार्यरत असलेल्या एका उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सीबीआयने संबंधित अधिकारी बी. एम. मीना आणि त्यांच्या पत्नीविरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्राथमिक माहितीनुसार, बी. एम. मीना हे सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुंबई येथील सीबीआयच्या बँकिंग फ्रॉड विभागात उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ५५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय, सुमारे १ कोटी ७८ लाख रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही तपास यंत्रणेला मिळाली. या संपत्तीचा स्रोत आणि व्यवहारांची माहिती संशयास्पद आढळल्यानंतर चौकशी अधिक तीव्र करण्यात आली.
तपासादरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९८ लाख ६३ हजार रुपयांची बेहिशेबी कमाई केल्याचे निष्पन्न झाले. या रकमांपैकी काही व्यवहार पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्यांमार्फत केल्याचेही उघड झाले आहे. या निष्कर्षांच्या आधारे सीबीआयने २८ एप्रिल रोजी बी. एम. मीना आणि त्यांच्या पत्नीविरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

