(संगमेश्वर)
तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय ४२) यांचा कोल्हापूर–पन्हाळा मार्गावरील पैजारवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. या घटनेमुळे साखरपा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिंदे हे आपल्या ताब्यातील लाकूड भरलेला सहाचाकी ट्रक (एमएच १७ बीवाय १८८७) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथे ट्रकचा ताबा सुटून तो पलटी झाला. या अपघातात विजय शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, विजय शिंदे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने साखरपा परिसरात शोक व्यक्त केला जात असून एक हरहुन्नरी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

