(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील देवडे ते भोवडे दरम्यानच्या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस व महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास देवडे–भोवडे नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. संशयित बाळू रामसिंग राठोड (रा. साखरपा, ता. संगमेश्वर) याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून ती ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.
भडकंबाचे पोलिस पाटील सुनील दिनकर दाभोळकर यांनी ट्रॅक्टर चालकास थांबण्याचा इशारा दिला असता, त्याकडे दुर्लक्ष करून आरोपी ट्रॅक्टरसह साखरप्याच्या दिशेने पसार झाला. या कारवाईत अंदाजे २ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच सुमारे ५० हजार रुपये किमतीची (ब्रास प्रमाणे) वाळू असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादीच्या आधारे भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २०२ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास देवरुख पोलिसांकडून सुरू आहे.

