(रत्नागिरी)
कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली होती. आरे-वारे समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या चार संशयित आरोपींना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी मुंबईतील दहिसर येथून काही पर्यटक आरे समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर त्यांचा चार अनोळखी तरुणांशी वाद झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाण आणि दमदाटीत झाले. भररस्त्यात पर्यटकांना धमकावण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर पीडित पर्यटकांनी तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानेही प्रकरण गांभीर्याने हाताळले.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र यादव यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि आधुनिक साधनांचा वापर करून आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी पनवेल परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला आणि चारही संशयितांना अटक केली. गुन्हा घडल्यापासून केवळ ४८ तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी जिल्हा हा सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. अशा घटनांचा पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, मात्र या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता ‘पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य’ असल्याचा स्पष्ट संदेश देते. या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

