(रत्नागिरी / वार्ताहर)
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच बालगोपाळ आनंदात रमले आहेत. या आनंदात ज्ञानाची गोड भर पडावी यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘टेरेस वाचनालय’ या संकल्पनेतून मुलांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना ‘ग्रंथमित्र’ बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रत्नागिरीतील विविध हौसिंग सोसायट्या, वाड्या-वस्त्यांमधील मुलांची संख्या लक्षात घेऊन त्या-त्या ठिकाणी ‘ग्रंथमित्र गट’ तयार करण्यात येणार आहेत. या गटांची वाचनालयात नोंदणी करून त्यांना बालवाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. हा उपक्रम १० मे ते १० जून २०२६ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
नोंदणीकृत गटांना त्यांच्या संख्येनुसार गोष्टीरूप पुस्तके दिली जातील. पुस्तके वाचून झाल्यानंतर नवीन पुस्तके बदलून देण्याची सुविधाही असेल. मुलांनी एकत्र बसून वाचनाचा आनंद घ्यावा किंवा घरी नेऊन वाचावे, तसेच वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपल्या शब्दांत नोंद एका वहीत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या शेवटी या नोंदवह्यांचा आढावा घेऊन उत्कृष्ट नोंदींना बक्षिसे देण्यात येणार आहेत. मात्र नोंदी मुलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात केलेल्या असणे आवश्यक आहे.
वाचनालयात मुलांसाठी समृद्ध बालसाहित्याचा मोठा साठा उपलब्ध आहे. मराठी व इंग्रजीतील विविध पुस्तक मालिका, जसे की ‘हॅरी पॉटर’, ‘फास्टर फेणे’, ‘फेमस फाईव्ह’, तसेच थोर व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, साहसकथा, युद्धकथा, चातुर्यकथा आणि विज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबाबत जिज्ञासा वाढवणारी पुस्तके मुलांच्या प्रतीक्षेत आहेत.
याशिवाय जवळपासच्या मुलांसाठी सकाळी ९.३० ते १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत मोफत वाचनालय सुरू ठेवण्यात येणार आहे. मुलांना शांत व प्रशस्त वातावरणात बसून वाचन करता यावे यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणारी मुलेही नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या सुट्टीत जास्तीत जास्त मुलांनी वाचनालयाचा लाभ घेऊन वाचनाची सवय जोपासावी आणि आपल्या विचारांना अभिव्यक्ती द्यावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

