(रत्नागिरी)
बौध्द धर्मातील चार सर्वात पवित्र स्थळापैकी एक असे जगप्रसिध्द बौध तीर्थक्षेत्र बिहार राज्यातील बौधगया या ठिकाणास भेटीची/दर्शनाची संधी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेतंर्गत मिळणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या स्थळाची निवड असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले आहे.
अर्ज घेण्याची प्रक्रिया 20 मे 2026 पर्यत राहणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, (दूरध्वनी क्र. ०२३५२-२३०९५७) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
सदर यात्रा प्रवास 3 जून ते 9 जून 2026 या कालावधी दरम्यान नियोजित आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला एका यात्रेकरिता योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. यात्रेचा प्रवास रेल्वेने होणार असून योजनेअंतर्गत प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारच्या आत असावे, लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्षे ६० वरील ज्येष्ठ नागरिक असावा. प्रवाशांच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातील.
राज्यातील 60 वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुंबई विभागामार्फत एकत्रितरित्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चा लाभ देण्याचे नियोजित आहे.

