(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या एम.बी.ए. (मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न एक प्रतिष्ठित महाविद्यालय असून स्थापनेपासून आजवर अध्ययन, अध्यापन, संशोधन, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
नॅक मूल्यांकनात सलग चार वेळा ‘अ’ श्रेणी मिळवल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.) आणि मुंबई विद्यापीठाने ३१ मे २०२३ रोजी या महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल केला. १ जून २०२३ पासून महाविद्यालय स्वायत्त झाले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन व कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात २०२४–२५ पासून बी.पी.ए. (बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) व बी.बी.ए. (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) तर २०२५–२६ पासून एम.एससी. (डेटा सायन्स) व एम.बी.ए. असे चार नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कला, वाणिज्य, शास्त्र या पारंपरिक शाखांबरोबरच महाविद्यालयात बॅचलर ऑफ अकाऊंटिंग अँड फायनान्स, माहिती तंत्रज्ञानशास्त्र, संगणकशास्त्र इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमही चालविले जातात. बी.बी.ए. अभ्यासक्रम सुरू करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील पहिले महाविद्यालय आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र शासनाकडून सी.ई.टी. (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) घेतली जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या एम.बी.ए. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियादेखील याच पद्धतीने पार पडत आहे.
शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची सुरुवात झाली. सी.ई.टी. गुणांवर आधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जात असून, साधारणतः तीन फेऱ्यांत प्रवेश होणार आहे. पहिली फेरी यशस्वीरीत्या पार पडली असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनी दुसरी आणि तिसरी फेरी गाठावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. अभ्यासक्रमासंबंधी सर्व माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर https://gjcrtn.ac.in/ वेळोवेळी उपलब्ध होणार आहे.
तसेच प्रवेशविषयक अधिक माहितीसाठी प्रा. स्वप्नील जोशी (मो. ९४०३३६१२००), प्रा. प्रविणा पिलणकर (मो. ९६७३०११९८५)
यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
स्वायत्ततेचा दर्जा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुरू करण्यात आलेल्या या सर्व अभ्यासक्रमांचा कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.