( रायगड )
रायगड जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळे त्यांच्यावर वेळेत उपचार होऊन त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे.
मयूर चांदुरकर यांना मागील ९ ते १० वर्षांपासून किडनी संबंधित त्रास होता. अचानक वजन घटणे, अशक्तपणा वाढणे यामुळे त्यांनी रुग्णालयात तपासणी केली असता हिमोग्लोबिन खूप कमी असल्याचे समोर आले. पुढील तपासणीत त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
आर्थिक अडचणीत कुटुंब
किरकोळ व्यवसाय करून कुटुंब चालवणाऱ्या चांदुरकर यांच्यावर वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी सुमारे १५ ते १८ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. सोशल मीडियातून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज केला. त्यांनी आपली परिस्थिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापर्यंत पोहोचवली.
12 लाखांची मदत
या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये तातडीने मंजूर करण्यात आले. तसेच समन्वयातून टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपयांची मदत मिळाली. या एकूण १२ लाखांच्या सहाय्यामुळे आवश्यक उपचार वेळेत सुरू होऊ शकले. यशस्वी उपचारानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत असून ते घरी परतले आहेत.
राज्यातील कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मयूर चांदुरकर यांच्या यशस्वी उपचारामुळे या योजनेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

