( नवी दिल्ली )
देशातील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात मोठा बदल करत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ मध्ये दुरुस्ती जाहीर केली आहे. या नव्या नियमांनुसार उबर, ओला, रॅपिडो यांसारख्या कॅब ॲप्सवर ॲडव्हान्स म्हणजेच प्रवासापूर्वी दिल्या जाणाऱ्या टिपिंगवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच महिला प्रवाशांसाठी बुकिंगच्या वेळी महिला चालक निवडण्याचा पर्याय देणे ॲग्रिगेटर कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लवकर पिकअप मिळावा किंवा चालक आकर्षित व्हावा म्हणून प्रवास सुरू होण्यापूर्वी दिली जाणारी टिपिंग सुविधा आता वापरता येणार नाही. यापुढे ऐच्छिक टिपिंग फक्त प्रवास पूर्ण झाल्यानंतरच देता येईल. बुकिंगदरम्यान किंवा प्रवास सुरू असताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे देण्यासाठी प्रवृत्त करू नये, असे स्पष्ट निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांकडून मिळणारी संपूर्ण टिप रक्कम कोणतीही कपात न करता थेट चालकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने यापूर्वीच ॲडव्हान्स टिपिंग ही अन्यायकारक व्यापार पद्धत असल्याचे नमूद केले होते. या पद्धतीमुळे कॅब बुकिंग प्रक्रिया बोलीसारखी होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. जास्त पैसे देणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य मिळते, तर सामान्य प्रवासी, विशेषत: पीक अवर्समध्ये, कॅबपासून वंचित राहतात, असे प्राधिकरणाचे म्हणणे होते.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. उपलब्धतेनुसार महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय देणे आता सर्व कॅब ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मसाठी अनिवार्य असेल. यामुळे कॅब सेवांमधील सुरक्षिततेला अधिक बळ मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.
महिलांना रोजगाराच्या नव्या संधी
सध्या बहुतांश कॅब ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर महिला चालकांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे नियम प्रभावीपणे राबवण्यासाठी कंपन्यांना अधिक महिला चालकांचा समावेश करावा लागणार आहे. यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात प्रतीक्षा वेळ वाढण्याची किंवा उपलब्धतेची मर्यादा जाणवू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना हे सुधारित नियम तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅब ॲग्रिगेटर्सविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.

