(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे नजीक खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने सलग सहा ते सात वाहनांना धडक देत भीषण साखळी अपघात घडवून आणला. या अपघातात अनेक जण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हालाल मोतीलाल (रा. राजस्थान) हा चालक ट्रक (क्र. आरजे-१९-जीएच-८४०३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने प्रथम पुढे चाललेल्या इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेचा जोर इतका होता की, इनोव्हा गाडी पुढे जाऊन चैतन्य बेंगळे यांच्या बीएमडब्ल्यू कारवर आदळली. यानंतर धडकांची ही साखळी पुढे वाढत रिक्षा, आयशर ट्रक, बोलेरो पिकअप आणि आणखी दोन ट्रकांपर्यंत पोहोचली. या साखळी अपघातात बीएमडब्ल्यू, इनोव्हा, बोलेरो पिकअप आणि रिक्षासह सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत चैतन्य बेंगळे व त्यांचे मामा सेंटैंगो देवासगायम डेव्हीड यांच्यासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
या अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने मदतकार्य हाती घेतले. घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.
दरम्यान, सावर्डे पोलिसांनी ट्रक चालक कन्हालाल मोतीलाल याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक ४५/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार स्नेहा घोसाळकर करत आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबई–गोवा महामार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षित वाहनचालना यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

