(छत्रपती संभाजीनगर)
सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. महाराष्ट्र दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी टेंभापुरी धरणावर पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (01 मे 2026) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणांची नावे शैलेश जोगदंड (वय २५), शैलेश वेळसेकर (वय २४) आणि अविष्कार लोखंडे (वय २५) अशी असून, ते सर्व वाळूज औद्योगिक वसाहतीत काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय घडले नेमके?
सार्वजनिक सुट्टी असल्याने एकूण नऊ मित्रांचा गट फिरण्यासाठी गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव परिसरातील टेंभापुरी धरणावर आला होता. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काह तरुण धरणात पोहण्यासाठी शिरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस आणि महानगरपालिका अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांचनवाडी आणि पदमपुरा येथील पथकांनी शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पाण्यात अडकलेल्या इतर सहा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अज्ञात जलसाठ्यांमध्ये पोहण्यासाठी जाणे अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा वारंवार देण्यात येत असतानाही तरुणांकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत जलतरणपटू राजेश भोसले यांनी व्यक्त केली. पाण्याची खोली, गाळ आणि अचानक वाढणारा प्रवाह यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज पोलीस अधिक तपास करत असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

