(गुहागर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील पालशेत येथे काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी गावातीलच माळरानावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सिद्धेश अशोक धातकर असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा २८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरी होता. त्याने आईला जेवण वाढण्यास सांगितले आणि त्यानंतर घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा गावासह परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. तरीही त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर २९ एप्रिल रोजी गुहागर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पोलीस आणि ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरू असतानाच सोमवारी (४ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास पालशेत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या पाठीमागील माळरानात एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सिद्धेशने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून, या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे पालशेत बाजारपेठ परिसरात शोक व्यक्त होत आहे.

