(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे आज (मंगळवार, ५ मे) रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उन्हाळी पर्यटन हंगामातच अंगारकीचा योग जुळून आल्याने घाटमाथ्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे ६० ते ७० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.
अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर पहाटे साडेतीन वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. प्रारंभी मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा, मंत्रपुष्प आणि आरती पार पडली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात सुबक आणि नियोजित रांगांची व्यवस्था संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंचकमिटीमार्फत करण्यात आली होती.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हापासून संरक्षणासाठी शेड, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने देवस्थानचे रक्षक, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी यांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडली. विशेष म्हणजे रत्नागिरीतील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवकही या सेवेत सहभागी झाले होते.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या सुमारे १५० पोलीस कर्मचाऱ्यांनी १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त सांभाळला. वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला होता. तसेच मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाविकांसाठी विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.
या यात्रोत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड, मिरज, कवठेमहांकाळ आदी घाटमाथ्यावरील भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यंदा अंगारकी चतुर्थी आणि उन्हाळी पर्यटन हंगाम एकत्र आल्याने अधिक गर्दी अपेक्षित होती. मात्र तीव्र उष्णतेमुळे अपेक्षेपेक्षा काहीशी कमी उपस्थिती राहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून सतत गस्त घालण्यात आली. गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीवरक्षकही या कामात सहभागी झाले होते. तसेच तातडीच्या आरोग्य सेवेसाठी देवस्थानची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.
सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक
अंगारकी चतुर्थी निमित्त सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची भव्य पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात ही मिरवणूक पार पडली. यात देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने घाटमाथ्यावरून विविध व्यापारीही दाखल झाले होते. त्यामुळे भाविकांना खरेदीचीही संधी उपलब्ध झाली. काही गणेश मंडळांकडून भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ अनेकांनी घेतला.
एकूणच, अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य, महावितरण, महसूल आणि इतर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत विशेष मेहनत घेतली.

