(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कळझोंडी नं. २ व जि. प. आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं. १ येथील नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या इमारतींचा उद्घाटन समारंभ रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उत्साहात संपन्न झाला.
कळझोंडी नं. २ केंद्र शाळेच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या उषा सावंत, पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर, माजी सभापती मेघना पाष्टे, प्रिया साळवी, उद्योजक आनंदाशेठ मुळ्ये, प्रकाशशेठ पवार, शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र (बाबय) कल्याणकर, उद्घाटन समिती अध्यक्ष तुकाराम फडकले, वासुदेव निंबरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश निंबरे, संजय पवार, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार, प्रभारी केंद्रप्रमुख जयदीप यादव, मुख्याध्यापक राजकुमार जाधव, मुंबई समिती अध्यक्ष संतोष निंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच व उद्योजक प्रकाश पवार यांनी केले. शाळेसाठी जमीन देणाऱ्या वनिता यशवंत निंबरे व त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच माजी शिक्षक, देणगीदार, अंगणवाडी सेविका, पोषण आहार देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक संजय कदम, क्रीडा शिक्षक व पुरस्कारप्राप्त राजेश जाधव, माजी विद्यार्थी संतोष निंबरे यांनी शाळेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला.
आपल्या भाषणात नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, बोलक्या भिंती आणि निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करत, या नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात गावातील विविध विकासकामांसाठी ग्रामस्थांनी निवेदन नगराध्यक्षांकडे सुपूर्द केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप यादव यांनी केले. रात्री विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. तसेच माजी विद्यार्थी संघ मुंबई यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘उंबरठ्यावरी माप ठेवि’ या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक, दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

