( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सोमवारी (दि. ४ मे) सकाळी १०.३० वाजता एस.एन. आयडियल हायस्कूल येथे उत्साहात पार पडले. या शिबिराला जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बांधकाम सभापती विलास चाळके तसेच देवरुखचे नायब तहसीलदार गिरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विलास चाळके म्हणाले, “जनता आणि अधिकारी यांच्यात समन्वयाने काम झाले, तर अशा विशेष अभियानांची गरज भासणार नाही.”
महसूल विभागाच्या सूचनांनुसार टप्पा क्रमांक १ अंतर्गत मंडळ स्तरावर ही समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार तहसीलदार कार्यालय, देवरुख (ता. संगमेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली देवळे मंडळातील नागरिकांसाठी हे शिबिर घेण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विषयक प्रश्न सोडवणे, तक्रारींचे त्वरित निराकरण करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शिबिरात विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. वनविभागाच्या सुप्रिया काळे, महिला व बालकल्याण विभागाच्या मोहिते, संजय गांधी योजनेच्या नीता कांबळे, पुरवठा विभागाच्या कविता शिंदे, महावितरणचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम त्रिभुवनवणे यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
तसेच स्थानिक पातळीवरील मान्यवरांमध्ये हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया गार्डी, पंचायत समिती सदस्य दिपाली जाधव, हायस्कूल समिती अध्यक्ष निलेश कोळवणकर, देवळे सरपंच विजया कोरगावकर, घाटीवळे सरपंच अनुष्का जाधव, दाभोळे सरपंच राजेश रेवाळे, चाफवली सरपंच आरोही रावण, तसेच प्रबोध आठल्ये, बंड्या परशेटये, पोलीस पाटील विजीत साळवी व विजय चाळके आदी उपस्थित होते.
या शिबिरात संजय गांधी योजनेअंतर्गत शांताराम देवजी कोटकर (दाभोळे), गणेश रामा खापरे (चाफवली) आणि मानसी सुनील केतकर (चाफवली) यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार गिरी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी व्ही.वाय. शिरोळे, तलाठी हरी लांब, कोतवाल संतोष गावडे व दिलीप मालप यांनी विशेष परिश्रम घेतले.

