(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
लांजा तालुक्यातील केळवली (वरचीवाडी) येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेत पाटगाव कुंभारवाडी (देवरुख) येथील बाल विकास पालखी नृत्य पथकाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला.
कोकणातील समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी श्री धावबा बाकयजी सेवा संस्था, केळवली यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जाकडी नृत्य, खेळे, नमन, ढोल वादन, भारुड अशा विविध पारंपरिक कलांप्रमाणेच पालखी नृत्य ही कोकणातील महत्त्वाची लोककला असून, तरुण पिढीमध्ये या कलेविषयी आवड निर्माण व्हावी आणि सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
स्पर्धेत विविध पथकांनी पौराणिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक देखावे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्या पथकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे —
प्रथम क्रमांक (₹११,१११): बाल विकास पालखी नृत्य पथक, पाटगाव कुंभारवाडी (देवरुख)
द्वितीय क्रमांक (₹७,७७७): सिद्धिविनायक पथक, तोणदे (रत्नागिरी)
तृतीय क्रमांक (₹५,५५५): श्री गांगोबा पथक, करंबळे (संगमेश्वर)
चतुर्थ क्रमांक: फ्रेंड्स ग्रुप, विघ्रवली (देवरुख)
तसेच विशेष पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोल वादनासाठी सिद्धिविनायक पथक, तोणदे यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट निशाण नृत्याचा पुरस्कार गणेश साळवी (पाटगाव कुंभारवाडी) यांना, तर उत्कृष्ट ताशा वादक म्हणून निलेश साळवी (पाटगाव कुंभारवाडी) यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेमुळे पारंपरिक पालखी नृत्य कलेला नवसंजीवनी मिळत असून, ग्रामीण भागातील युवकांमध्ये सांस्कृतिक जाणीव आणि संघभावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

