(रत्नागिरी)
रत्नागिरी–पावस रोडवरील कसोप फाट्यावर आज सकाळी सुमारे १०.३० वाजता कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती अल्टो कार आणि बुलेट दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. त्या वेळी फणसोप येथे आपल्या बागेत जात असलेले वल्लभ वसंत वणजू यांनी अपघात पाहताच तात्काळ मदतीला धाव घेतली. त्यांनी जखमी व्यक्तीला प्रथम स्थिर केले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी बसवले.
योगायोगाने तेव्हाच एक ॲम्बुलन्स त्या मार्गावरून जात होती. उपस्थितांनी तत्परतेने जखमीला ॲम्बुलन्समध्ये हलवून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व युनिक फाउंडेशन रत्नागिरीचे शकील गवाणकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.
अपघाताच्या वेळी वणजू यांनी दाखवलेली तत्परता आणि मदतकार्य कौतुकास्पद ठरले. अनेकदा पोलीस किंवा न्यायालयीन प्रक्रियेच्या भीतीने नागरिक अपघातग्रस्तांना मदत करण्यास कचरतात. मात्र अशा प्रसंगी पुढे येऊन मदत करणे हेच खरे सामाजिक कर्तव्य असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

