(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा उच्छाद वाढला असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानकासह शिरलप, मिरजोळे, नवीपेठ, कुवारबाव आदी ठिकाणी गायी, बैल व वासरे कळपाने फिरताना सहज दिसतात. काही वेळा ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसतात, तर अचानक धाव घेतल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचे संकट निर्माण होते.
शाळा-काॅलेजची वेळ अथवा संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या गर्दीत हा त्रास अधिक तीव्र होतो. गुरांच्या कळपामुळे रस्त्यावर कोंडी होते; त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो, तर पादचारी, विशेषत: मुले, महिलावृद्ध यांना रस्त्याने जाणे धोकादायक ठरते. “दररोज प्रवास करताना आमचे हाल होतात. रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर थांबवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होईल, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाहतुकीतील अडथळ्याबरोबरच या उपद्रवाचा फटका स्वच्छता व्यवस्थेलाही बसतो आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा किंवा डेपोत साचलेला कचरा ही जनावरे खाद्य शोधत उपसतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढते. पर्यटननगरी असलेल्या रत्नागिरीची प्रतिमाही या दृश्यामुळे मलिन होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत महानगरपालिका आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल होऊनही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. रत्नागिरीसारख्या जिल्हा मुख्यालयात बेबंद व्यवस्था पाहायला मिळणे हे खेदजनक आहे. गुरांचा प्रश्न हा केवळ अस्वच्छतेचा नाही, तर थेट सुरक्षेशी निगडित आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा प्रश्न हा नवा नसला तरी गेल्या काही महिन्यांपासून तो अधिकच तीव्र झाला आहे. तातडीने लक्ष घालून संबंधित विभागांच्या मदतीने ठोस कारवाई केल्यासच नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

