(कळझोंडी / किशोर पवार)
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे वतीने जाहीर निषेध केला असून या हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे वतीने रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे कार्यालयात दिलेल्या निवेदनात ही मागणी केली असून सदरची निवेदने भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही सादर करण्यात आली आहे.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दालनात सोमवार दि. ६ रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्यासमोर सुनावणी सुरू असताना माथेफिरू वकील राकेश किशोर तिवारी हा पुढे येऊन भारताच्या सरन्यायाधीश यांच्या दिशेने बूट काढून फेकून मारण्याच भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सदरचे हे निंदनीय कृत्य असून भारतीय संविधानाला व लोकशाहीला फार मोठा धोका पोहोचवणारे आहे. ही निंदनीय कृती भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी व भारताचे इतिहासाला डाग लावणारी आहे. तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे.
तरी या माथेफिरू राकेश किशोर तिवारी ने केलेल्या निंदनीय कृत्यास सजा म्हणून अतिशय कठोरात कठोर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुका व तमाम भारतीय यांच्यावतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सह सेक्रेटरी शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, त्याचबरोबर प्रीतम आयरे, रविकांत पवार, गौतम कदम, रजत पवार, सुनील कांबळे, मिलिंद कांबळे, मिलिंद सावंत, सुशिल सावंत, रत्नागिरी तालुका महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
या निवेदनाच्या प्रारंभी रत्नागिरी जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार व पदाधिकारी यांचे हस्ते बुके देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर कोकण आयुक्त सुर्यवंशी यांचेही रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे वतीने तालुका अध्यक्ष प्रकाश पवार व पदाधिकारी यांचेवतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

