(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथून चोरीस गेलेल्या कारचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे सराफाच्या दुकानावर दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत चोरीच्या गाडीचा छडा लावण्यात यश मिळवले असले, तरी संबंधित टोळी अद्याप फरार असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
बुरंबी येथील मारुती नागेश सुतार यांची (एमएच ०८, झेड ४७०३) ही कार घराबाहेर उभी असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ती लंपास केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. यात चोरट्यांनी महामार्गावरून वेगाने आणि नियोजनबद्ध हालचाली करत पसार झाल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले. चोरट्यांनी ही गाडी चिपळूणमार्गे कन्हाड मार्गे थेट कोल्हापूर जिल्ह्यात नेली आणि शाहूवाडी तालुक्यातील एका सराफाच्या दुकानावर ‘फिल्मी’ पद्धतीने दरोडा टाकला. दरोड्यानंतर पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्यांनी मुख्य मार्ग टाळून अंतर्गत रस्त्यांचा वापर केला आणि केरले गावाच्या हद्दीत गाडी बेवारस सोडून दिली.
दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत असलेल्या संगमेश्वर पोलिसांना शाहूवाडी येथे संशयित गाडी आढळल्याची गोपनीय माहिती मिळाली. तेथील पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सराफ दुकानावरील दरोड्याच्या तपासात तीच गाडी सापडल्याचे स्पष्ट झाले. पडताळणीत ती गाडी बुरंबीतून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. गाडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी चोरीपासून दरोड्यापर्यंतचा संपूर्ण कट लक्षात घेता ही टोळी सराईत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गाडी शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती मूळ मालकाला परत देण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.

