(रत्नागिरी)
तालुक्यातील पाली बाजारपेठ येथील वैभव देशी दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्याने रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा आरोप आहे. अशोक थोडु तारी ( मूळचा दगडु पवार चाळ नंबर २, रूम नंबर २२, स्वदेश मिल रोड, चुनाभट्टी, सायन, मुंबई) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनोद शांताराम रसाळ (वय ४५, व्यवसाय व्यापार, रा. पाली बाजारपेठ) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित अशोक तारी याने २ एप्रिल रोजी दिवसभर देशी दारूची विक्री करून आलेले २१ हजार रुपये आणि दुकानातील १८० मिलीच्या १२२६ नग संत्रा देशी दारूच्या सीलबंद बाटल्या (किंमत ९८ हजार ८० रुपये), ९० मिलीच्या १४४० नग सीलबंद बाटल्या (किंमत ५७ हजार ६०० रुपये) तसेच ७५० मिलीच्या १२ नग बाटल्या (किंमत ३ हजार ८४० रुपये) असा एकूण १ लाख ५९ हजार ५२० रुपयांचा दारूसाठा चोरला. याव्यतिरिक्त, आरोपीने जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या दरम्यान विक्री केलेल्या देशी दारूची ७२ हजार ९८० रुपये इतकी रक्कम देखील स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा आरोप आहे.
अशा प्रकारे, आरोपी अशोक तारी याने दुकानातील एकूण ९३ हजार ९८० रुपये रोख रक्कम आणि १ लाख ५९ हजार ५२० रुपयांची दारू, म्हणजेच एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा माल चोरून पलायन केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित अशोक थोडु तारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.