आजच्या डिजिटल युगात जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे, तिथेच सायबर गुन्हेगारीचे सावटही गडद होत आहे. अशा आव्हानात्मक काळात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस आधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कौशल्याने आणि जिद्दीने सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पोलीस निरीक्षक स्मिता शंकर सुतार करत आहेत. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी प्रबोधनात्मक जनजागृती आणि ठगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई अशा त्यांनी राबवलेल्या प्रभावी कार्यशैलीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांनी प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले आहे.
ऑगस्ट २०२४ पासून सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या स्मिता सुतार यांनी अल्पावधीतच अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून समाजात सुरक्षेची भावना निर्माण केली आहे.
तपासातील चोख कामगिरी आणि महत्त्वपूर्ण अटक
गेल्या दोन वर्षांत सायबर पोलिसांनी विविध राज्यांतून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील काही प्रमुख कारवाया खालीलप्रमाणे आहेत:
आंतरराज्यीय कारवाया: ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी थेट हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात (राजकोट) पर्यंत जाऊन गुन्हेगारांना अटक केली आहे.
डिजिटल अरेस्ट आणि फसवणूक: अलीकडच्या काळात वाढलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीला न जुमानता, बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १.२३ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात त्यांना यश आले.
फेसबुक व सोशल मीडिया गुन्हे: जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते उघडून लोकांची फसवणूक करणाऱ्या असो किंवा महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांना त्रास देणाऱ्या विकृत प्रवृत्ती असोत, स्मिता सुतार यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अशा गुन्हेगारांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
केवळ कारवाईच नाही, तर जनजागृतीवरही भर
गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांचे कर्तव्य असले, तरी गुन्हे घडूच नयेत यासाठी स्मिता सुतार या विशेष प्रयत्नशील आहेत. “प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला” या उक्तीनुसार त्यांनी विविध स्तरांवर सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले आहे:
१. शैक्षणिक संस्था: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण पिढीला इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, याचे धडे दिले.
२. महत्त्वाचे उपक्रम: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित अंमली पदार्थ विरोधी मोहीम (DAWN २०२५) आणि भारतीय वैद्यकीय असोसिएशनच्या (WDW) महिला दिन कार्यक्रमात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
३. प्रसारमाध्यमे: आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘इंद्रधनु’ कार्यक्रमाद्वारे त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत सायबर क्राईम टाळण्याचे उपाय पोहोचवले आहेत.
स्मिता शंकर सुतार यांची कारकीर्द ही केवळ गुन्ह्यांच्या तपासापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक जबाबदारीचे एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला सतर्क करणे, अशा दुहेरी भूमिकेतून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरीतील सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्या बजावत असलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आणि आश्वासक आहे.
–प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

