(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा कणा मानले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरेच बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रत्नागिरी शहरात बसविण्यात आलेल्या ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी केवळ सात ते आठ कॅमेरे कार्यरत असून उर्वरित बहुतांश कॅमेरे ठप्प असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित दुरुस्ती एजन्सीने वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ५७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे, अपघात वा आपत्कालीन प्रसंगी तत्काळ तपासास मदत मिळणे आणि सार्वजनिक सुरक्षेवर प्रभावी नजर ठेवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. सुरुवातीच्या काळात सर्व कॅमेरे व्यवस्थित सुरू होते आणि त्यांचा नियंत्रण कक्ष पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. मात्र कालांतराने बहुतांश कॅमेरे बंद पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित कंपनीला दुरुस्तीच्या सूचना वारंवार देण्यात आल्या; तरीही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, सार्वजनिक सुरक्षेशी निगडित असलेल्या या गंभीर त्रुटीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. एजन्सीकडून काही कॅमेरे दुरुस्त केल्याचा अहवाल सादर करण्यात आला असला, तरी त्याची प्रत्यक्ष पाहणी करूनच अंतिम खातरजमा करण्यात येणार असल्याचे बगाटे आणि महामुनी यांनी नमूद केले. दरम्यान, शहरातील सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये आता नाराजी व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा ही केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्षात कार्यक्षम राहणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

