(रत्नागिरी /प्रतिनिधी)
उन्हाच्या कडाक्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून, सध्या ४३ गावांमधील ९९ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. या परिस्थितीचा फटका तब्बल ३४ हजार २९५ ग्रामस्थांना बसत असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाकडून १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी वाढत्या मागणीच्या तुलनेत तो अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, केवळ आठवडाभरातच टंचाईग्रस्त भागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नव्याने २१ वाड्यांचा समावेश टंचाईग्रस्तांमध्ये झाला असून, परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मागील आठवड्यात ३२ गावांतील ७८ वाड्यांमध्ये २७ हजार ८३२ ग्रामस्थांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, तापमानात झालेल्या झपाट्याने वाढीमुळे नद्या, नाले, विहिरी तसेच विंधन विहिरी आटल्याने जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत. परिणामी, पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
सध्या १४ खासगी आणि ३ शासकीय अशा एकूण १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी तो गरज भागवण्यासाठी अपुरा पडत आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. संगमेश्वर तालुक्यात टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

