( मुंबई )
शहरातील वांद्रे परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला लघवी करण्यास रोखल्याच्या कारणावरून एका 78 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाणे यांनी तातडीने कारवाई करत 44 वर्षीय भानुदास कांबळे (रा. ठाणे) याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत महिलेची ओळख धारावी येथील शाहू नगर भागातील रहिवासी सौभाग्यम्मा काथिमुनार अशी पटली आहे. त्या बेपत्ता असल्याची नोंद यापूर्वीच पोलिसांत करण्यात आली होती.
फूटपाथवर बेशुद्ध अवस्थेत आढळली महिला
पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 7 वाजता वांद्रे येथील आरएनए बिल्डिंगजवळ फूटपाथवर एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिला तातडीने सायन रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानून ADR नोंदवण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार आणि त्यानंतर गळा दाबल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात घटनास्थळाजवळ एक संशयित व्यक्ती दिसून आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तो इलेक्ट्रिशियन असून कामावरून परतताना रस्त्याच्या कडेला लघवी करत होता. त्यावेळी फूटपाथवर झोपलेल्या महिलेने त्याला तसे करण्यास रोखले. यामुळे संतापून त्याने जवळील विटेने तिच्या डोक्यात वार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

