(पुणे)
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका अत्यंत घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप ६५ वर्षीय भीमराव कांबळे याच्यावर आहे. या अमानुष कृत्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे. या प्रकरणात आरोपीच्या पत्नी आणि मुलाने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनीही आरोपीच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
पतीच्या कृत्याविषयी बोलताना आरोपीची पत्नी संतापाने भरून आली होती. “जिथे त्या निष्पाप बाळाची हत्या झाली, त्याच ठिकाणी त्याला शिक्षा व्हावी,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर “फाशी हीसुद्धा कमी शिक्षा आहे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “मला त्याचा चेहराही पाहायचा नाही. त्याच्या मृत्यूची बातमीही मला कळवू नका, त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कोणी सांगायला पण येऊ नका” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, “मला अकरा नातवंडं आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही.”
पत्नीने सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे आणि आरोपीचे कोणतेही संबंध नव्हते. तो आमच्यासोबत राहत नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या १० वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो नेहमी ‘तुझं तू बघ’ असं म्हणून आम्हाला झिडकारायचा. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी आणि न्याय मोठा असल्याचे सांगत तिने प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “अशा व्यक्तीचा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याच्या पोटी जन्मलो, हाच माझा गुन्हा आहे, तो माझा बाप आहे हेच माझं दुर्दैव,” असेही त्याने स्पष्ट शब्दांत म्हटले. भूतकाळातील काही घटनांमुळे आपण त्याच्याशी संबंध तोडल्याचेही त्याने सांगितले.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

