( पुणे )
पुण्यातील विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुटस् स्पा’ येथे सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलीस ठाणे पथकानेच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करत असताना दोघेजण खाली पडले. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये स्पाचा मॅनेजर हुसेन शेख याचा समावेश असून त्याचा पाय मोडला आहे. तर पश्चिम बंगालची मूळ रहिवासी असलेली ३० ते ३५ वयोगटातील महिला खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. जखमी हुसेन शेखवर ससून जनरल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी केली खात्री
संबंधित स्पामध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. खात्री झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचासमक्ष छापा टाकण्यात आला.
काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर स्पामध्ये चार महिला आणि चार पुरुष आढळून आले. या प्रकरणी सोमवार उशिरापर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असून, स्पा चालक आणि संबंधित नेटवर्कबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
या घटनेमुळे पुण्यातील स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

