(रत्नागिरी)
तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. गावचे सुपुत्र, सुस्वभावी व संयमी व्यक्तिमत्व लाभलेले श्री. सुनील सखाराम डांगे यांची रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने डांगेवाडी तसेच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
श्री. सुनील डांगे हे केवळ एक सुसंस्कृत आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व नव्हते, तर त्यांच्या हातात नेहमीच लेखणी असायची. विचारशीलता आणि सृजनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. ते श्री जंबुकेश्वर मंदिराचे माजी अध्यक्ष होते. या कार्यकाळात त्यांनी मंदिराच्या विकासासाठी आणि गावातील सामाजिक ऐक्य यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या ते श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. उत्सवांचे उत्कृष्ट नियोजन आणि भक्तिभावाने भरलेल्या कार्यक्रमांमुळे त्यांची विशेष दखल घेतली जात होती.
त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांच्या विनम्रतेचा व प्रसन्नतेचा गंध कायम सर्वांच्या मनात राहणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगी धैर्य मिळो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.