( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अखेर ॲड. सुयोग कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा उमेदवार कोण, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
ॲड. सुयोग कांबळे हे हातखंबा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. ग्रामपंचायत पातळीवरील कामातून त्यांनी गावकऱ्यांशी थेट संपर्क साधला असला, तरी जिल्हा परिषदेची निवडणूक ते पहिल्यांदाच लढत आहेत. त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेचा आवाका आणि जबाबदारी लक्षात घेता, ॲड कांबळे यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची साथ कशा स्वरूपाची राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, या गटात आधीच वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत मैदानात उतरले असून त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसह इतर बसपा, RPI गवई गट या पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने लढत अधिक चुरशीची होत चालली आहे. एकूणच, हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटातील निवडणूक अनुभव, नेतृत्व आणि जनाधाराच्या कसोटीवर ठरणार असून, येत्या काळात प्रचाराची तीव्रता अधिक वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

