(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने पाणीपुरवठ्याबाबत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियोजनानुसार दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, आठवड्यातील उर्वरित सहा दिवस केवळ एक तासच पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठा झपाट्याने घटत असून, सध्या केवळ ४० ते ४३ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रखर उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, जलपातळी चिंताजनकरीत्या खालावत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे पानवल धरणातून पाणीपुरवठा ठप्प आहे. संबंधित जलवाहिनीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने संपूर्ण भार शीळ धरणावरच पडत आहे. सध्या शहरात सव्वा ते दीड तास पाणीपुरवठा केला जात असला, तरी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तो कालावधी कमी करून सर्वांसाठी एक तासावर आणण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडून विचाराधीन आहे. रत्नागिरी शहरात १२ हजारांहून अधिक नळजोडण्या असून, दररोज सुमारे १७ ते १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, उपलब्ध साठा झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा उशिरा सुरू होण्याची तसेच पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे पाणी व्यवस्थापन अधिक कठीण होण्याची चिन्हे आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळेही पाण्याचा अपव्यय होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. पाणीटंचाईवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पानवल धरणातील पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासह प्रलंबित जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची बचत हाच सध्याच्या संकटावर उपाय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

