( रत्नागिरी )
समूह पुनर्विकास प्राधिकरण, दि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार गटनेते (विधान परिषद) श्री. प्रविण दरेकर यांनी आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बँकेचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी बँकेतर्फे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन दरेकर यांचा आदरपूर्वक सत्कार केला. तर बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेची आर्थिक प्रगती
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी यावेळी बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा सादर केला. ते म्हणाले, “२०२४-२५ या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा बँकेने ₹५,००० कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असून, २०२३-२४ या वर्षात बँकेच्या सभासदांना ३०% उच्चांकी लाभांश देण्यात आला आहे.”
बँकांसमोरील अडचणी
संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हा बँकांना कामकाजात भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या अडचणींचा उल्लेख केला.
त्यात नवीन शाखांना मंजुरी मिळण्यात होणारा विलंब, कोकणातील ७/१२ उताऱ्यांवर अनेक व्यक्तींची नावे असल्यामुळे कर्जवाटपातील अडचणी, तसेच वसुली अधिकार बोथट होणे या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व विषयांवरील निवेदन आमदार दरेकर सुपूर्द करून शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
आमदार दरेकर यांचे आश्वासन
आपले मनोगत व्यक्त करताना प्रविण दरेकर म्हणाले, “महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना १०६ वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींनी केली होती. या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
ते पुढे म्हणाले, “जिल्हा बँकांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून प्रगती साधावी. फलोत्पादन प्रक्रिया, मासेमारी आणि पर्यटन क्षेत्रात सहकारी संस्था उभ्या करण्याचे प्रयत्न व्हावेत. सर्व कोकणातील जिल्हा बँका ‘अ’ वर्गात असून, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.”
आमदार दरेकर यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच ७/१२ उताऱ्यातील १० गुंठे अटीत शिथिलता, व्यक्तिगत कर्जमर्यादा वाढविणे, वसुली प्रक्रियेतील सुधारणा आणि पोटनियमांत आवश्यक बदल करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेही ते म्हणाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला बँकेचे सन्माननीय संचालक अॅड. दीपक पटवर्धन, श्रीमती दिशा दाभोळकर, श्री. जयवंत जालगांवकर, श्री. अमजद बोरकर, श्री. गजानन पाटील, श्री. मधुकर टिळेकर, श्री. राजेंद्र सुर्वे, श्री. महेश खामकर, श्री. रामचंद्र गराटे, मा. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

