(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत प्रसिद्ध नाट्यलेखक यशवंत माणके लिखित ‘तो कोण होता’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रिक्षा मालक-चालक संघाच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘श्री समर्थ नाट्यगंधा’ संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, रिक्षा व्यवसायात कार्यरत असलेल्या बांधवांनी एकत्र येऊन उभारलेली ही नाट्यसंस्था सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
या प्रयोगानिमित्त ‘तो कोण होता’ या नाटकाच्या पुस्तकाचेही थाटात प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, ज्यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
कार्यक्रमात रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील आणि भगवान नारकर यांनी यशवंत माणके यांच्या कार्याचा गौरव केला. “सध्या नाट्यक्षेत्रात सातत्याने लेखन करणारे लेखक मोजकेच आहेत. अशा परिस्थितीत कोकणातील यशवंत माणके यांनी २९ नाटके लिहून तरुण लेखकांसाठी आदर्श निर्माण केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या मनोगतात यशवंत माणके यांनी रिक्षा संघटनेच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. “‘तो कोण होता’ या नाटकाचा विषय अत्यंत ज्वलंत असून, तो प्रामाणिकपणे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढेही नवनवीन विषयांवर लेखन सुरू ठेवण्याचा मानस आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दिग्दर्शक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ नाट्यगंधाच्या कलाकारांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. रिक्षा व्यावसायिकांमधील उपजत कलागुणांनी सादर केलेला हा प्रयोग व्यावसायिक नाटकांना तोडीस तोड ठरला. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या प्रयोगाला उत्स्फूर्त दाद दिली.
या सोहळ्याला उद्योजक श्रीपत शिंदे, रमेश खैर, संगीतकार योगेश मांडवकर, रंगभूषाकार आनंद कुमठेकर तसेच सचिन मिसाळे, पिंट्या खवले, प्राजक्ता पवार, शर्वरी अवसरे, आशिष सरमोकादम, श्रीरंग कुंभार, शशिकांत किंजलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

