(रत्नागिरी)
कराटे असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने 28 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत तीन दिवसीय ‘ॲडव्हान्स कराटे समर कॅम्प’ उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित या शिबिराला कराटे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात मिरकर मार्शल आर्ट अकॅडमी आणि ए. बी. स्पोर्ट्स अकॅडमी, रत्नागिरी येथील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना कराटे स्पर्धांसाठी आवश्यक असलेले काता आणि फायटिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. मुंबईहून आलेले राष्ट्रीय प्रशिक्षक अविनाश मोरे आणि प्रसाद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान काता प्रकारासाठी वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली. तसेच फायटिंगसाठी आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धात्मक तयारीला मोठी मदत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कराटे असोसिएशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमांतर्गत मिरकर मार्शल आर्ट अकॅडमी आणि ए. बी. स्पोर्ट्स अकॅडमी सक्रिय भूमिका बजावत आहेत. अकॅडमीचे प्रशिक्षक जावेद ह. मिरकर आणि अरुण जु. बेग हे विद्यार्थ्यांना कराटे क्षेत्रात पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना आगामी शालेय व संघटनात्मक कराटे स्पर्धांसाठी आत्मविश्वास आणि कौशल्य मिळणार असून, ते जिल्ह्याचे नाव उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिबिरासाठी पालकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा संघटना व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

